शिरोळ न्यूज

जिल्हा बँक निवडणूक शुक्रवारी मोठ्या राजकीय घडामोडी

शिरोळ/महान कार्य ,दि. 2021-10-23- जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोठ्या राजकीय घडामोडी कोल्हापूर, कुरुंदवाड आणि जयसिंगपुरात घडल्या आहेत. राजकीय नेत्यांनी तपशील सांगण्यास रात्री उशिरा नकार दिला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर 11 ठरावधारक समुह नेत्यांना कंटाळून बाजूला जाण्याची शक्यता पुढे आली आहे, असे कळते.

आमच्यावर दबाव आणून लोकशाहीचा खून केला-आवळे

कुरुंदवाड/महान क,दि. 2021-10-23- कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यासाठी थिएटर चौकात कृती समितीचे नेते माजी नगरसेवक राजू आवळे आणि त्यांच्या समर्थकांनी मोर्चाला सुरुवात करताच मोर्चेकर्यांना याच ठिकाणी घेरले, एक इंचही मागे-पुढे करु दिले नाही. मोर्चा काढण्यापेक्षा नगरपालिकेत जा आणि चर्चा करा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नका, असा सल्ला पोलिसांनी दिली. यावेळी किरकोळ बाचाबाची सुरु झाली आणि अखेर पोलिसांनी सर्व मोर्चेकर्यांना पोलीस ठाण्यात नेले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि काही काळानंतर सोडून दिले. या मोर्चात राजू आवळेंच्याबरोबर सुनिल कुरुंदवाडे, विलास उगळे, अर्शद बागवान व अन्य प्रमुख उपस्थित होते.

जयराम पाटील अंगार है, कृती समिती भंगार है-पाटील

कुरुंदवाड/महान क,दि. 2021-10-23- माजी नगरसेवक शिवसेना नेते राजू आवळे यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीने नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी मोर्चा आणण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याला रोखठोक जशास तसे उत्तर देण्यासाठी कुरुंदवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय जयराम पाटील रस्त्यावर उतरले. पाटील यांच्यासोबत प्रचंड प्रमाणात त्यांचे समर्थकही रस्त्यावर आले आणि विजय पाटील यांनी यावेळी घोषणा द्यायला सुरुवात केली, ‘जयराम पाटील अंगार है, कृती समिती भंगार है’ असा सांगतच पाटील यांनी गंभीर इशारा दिला, प्रश्न शहराचे असतील तर नगरपालिकेत सोडवले जातात. व्यक्तीगत पातळीवर उतराला आणि घरावर मोर्चा काढायचा प्रयत्न कराल तर आम्हीही बांगड्या घातल्या नाहीत, आम्हीही राजकरणात आहोत, 40-50 वर्षे जनता जयराम पाटील यांच्या सोबत राहिली आहे. लोकशाहीत आम्हालाही अधिकार आहेत, त्या अस्त्रांचा आम्ही वापर करु. सोडणार नाही, सुट्टी देणार नाही, असा इशारा देत त्यांनी ज्या मार्गाने आवळेंचा मोर्चा येणार होता त्याच मार्गाने आगेकूच करायला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना सन्मित्र चौकात रोखले आणि पाटील व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले.

एफआरपी अधिक 500 रु. घेतल्याशिवाय सोडणार नाही

शिरोळ,दि. 2021-10-23- मुश्रीफांचे आव्हान आम्ही स्विकारतो, द्या कारखाना चालवायला, 4 हजार दर देतो । जयसिंगपुरात ऊस परिषद घेतात आणि कारखानदारांच्या गाडीत बसून शिरोळ तालुक्यात फिरतात शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा : गेल्या हंगामातील 200 रु. अद्यापही ऊस उत्पादकांना मिळाले नाहीत. या हंगामात एफआरपी अधिक 500 रु. साखर कारखानदारांना द्यावेच लागतील. यावर्षीची लढाई रस्त्यावरही असेल आणि न्यायालयीनही करु, कारखानदारांना जेरीस आणल्याशिवाय सोडणार नाही. दत्त कारखान्याच्या भानगडी सुरु आहेत, त्याविरुध्द आवाज उठवावाच लागेल. गावगुंड पुढारी करारपत्र घेऊन दारात येतील त्यावर सह्या करु नका, तर त्यांना निवडणुकीत पराभूत करा आणि ऐतिहासिक क्रांतीकारी ऊस उत्पादकांच्या लढ्यात सहभागी व्हा. ऊस उत्पादकांची दिशाभूल करुन चळवळीच्या नावाखाली फसवणार्या लबाड, ढोंगी पुढार्यांपासून सावध रहा. जयसिंगपुरात परिषद घेतात आणि शिरोळ तालुक्यात सारखर कारखान्याच्या चेअरमनच्या गाडीत बसून त्यांचाच प्रचार करत फिरता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाभिमानीला जे आव्हान दिले आहे ते का दिले, राजू शेट्टी आणि त्यांचे साटेलोटे आहे म्हणून, त्यांचे आव्हाने शेट्टी स्विकारणार नाहीत. मंत्री मुश्रीफ यांनी आम्हाला कारखाना द्यावा, आम्ही 4 हजार रु. प्रतिटन दर देतो. मुश्रीफांचे आव्हान खुलेआम स्विकारतो. पण, शेतकर्यांनी सावध रहायला हवे, असे आवाहन आंदोेलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी ऐतिहासिक पाचव्या एल्गार परिषदेत शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून केले आहे. धनाजी चुडमुंगे बोलताना म्हणाले, साखर कारखानदारांचे नेहमी रडगाणे असायचे, साखरेला दर कमी आहे आणि ऊस जास्त आहे त्यामुळे शेतकर्यांनी ऊसाचा दर मागू नये. असे प्रत्येक हंगामात ते तुणतुणे वाजवायचे. पण, यावर्षीचा हंगाम वेगळा आहे. दोन महिन्यापूर्वीपासून एफआरपी 3 टप्प्यात देणार असे वातावरण करायला त्यांनी सुरुवात केली आणि आज कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर करायला सुरुवात केली आहे. याचे कारण वाढलेल्या साखरेच्या दरात आहे. कारखानदार आपल्यावर उपकार नाहीत, 2016-17 साली ऊस उत्पादकांना सुवर्णकाळ आला होता. यावर्षी आणि पुढच्या वर्षी असाच सुवर्णकाळ असणार आहे आणि दोन वर्षात ऊसाला चांगला दर मिळणार आहे. एफआरपी अधिक 200 रु. या कारखान्यांनी मागच्यावर्षी गाळप झालेल्या ऊसाला द्यायला पाहिजे होते ते अद्याप दिलेले नाहीत. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी आजही होत नाही. याचाच फायदा कारखानदार घेत आहेत आणि शेतकर्यांना लूटत आहेत. कारखान्यांचे हिशोब दोन महिन्यानंतर तपासून कारखान्यांना कायदेशीररित्या हे पैसे द्यावे लागतील आणि गेल्या वर्षीच्या 200 रु.साठीचा लढा सुरुच राहिला. भांडवलदारांचे लांगूलचालन करणार्या पुढार्यांनी दत्त कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला त्रास दिला आहे. पण, आम्ही अशा त्रासाला भिक घालणार नाही. बळजबरीला, गावगुंडांच्या धमक्यांना न जुमानता आंदोलन अंकुशचा लढा सुरुच राहणार आहे. शेतकर्यांनी थकीत एफआरपीचे व्याज मागायला शिकलेच पाहिजे. कारण, ते व्याज आमच्या हक्काचे आहे, श्रमाचे आहे. शेतकर्यांनी आज साथ दिली आहे, त्याचमुळे आपला लढा यशस्वी होत चालला आहे, अशीच साथ यापुढेही द्यावी. ही शिरोळची भूमी आहे, येथून चळवळी मोठ्या होतात, चार वर्षे आम्ही लढा देतोय आणि आज कारखाने वठणीवर आले आहेत. त्याचमुळे त्यांनी एकरकमी एफआरपीची घोषणा सुरु केलीआहे. याचे कारण आहे, एकतर साखरेचे वाढलेले दर आणि गेली चार वर्षे एफआरपी थकवली तर व्याज मागतो, कोर्टात जातो, तहसिलदारांच्या दारात बसतो म्हणूनच आज हे पोपटासारखे बोलत आहेत. अजूनही आमच्या तालुक्यातील दोन कारखाने मुर्दाडपणाने वागत आहेत त्यांना वठणीवर आणायचे आहेत, तुम्ही मला साथ द्या आणि खंबीरपणे लढण्यासाठी पुढे या. बी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्माण करणार्या कारखानदारांना जाब विचारावा लागेल. पाच कारखान्यांनी 62.रु. 50 पैसे दर घेतला आहे, त्यांनी 650 रु. जास्त मिळविले आहेत. पण, ते ऊस उत्पादकांना देत नाहीत. रविवारी या दोन कारखान्यांचा आम्ही ऊस आडवू. शेतकर्यांचा दबाव कारखान्यांच्यावर रहायला

प्रत्येक गावात, शहरात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तात्काळ सुरु करा

कोल्हापूर/महान क,दि. 2021-10-22- कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरु करावीत, 15 नोव्हेंबरपर्यंत किमान 2 विरंगुळा केंद्रे सुरु करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे आणि संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, विरंगुळा केंद्रामुळे जेष्ठांना एकत्र येण्याचे व आपला वेळ घालवण्याचे हक्काचे ठिकाण मिळेल.

रविकांत तुपकर हे पात्र वैचारिक दिवाळखोरीतून निघालेले

शिरढोण/महान कार्,दि. 2021-10-22- रविकांत तुपकर हे स्वाभिमानी ऊस परिषदेतील पात्र वैचारिक दिवाळखोरीत निघालेले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांचा त्यांनी घोर अपमान केला आहे, त्यांना लाज वाटायला हवी होती, असा तिखट संताप विभागातील जेष्ठ नेते प्रा. चंद्रकांत मोरे यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. प्रा. मोरे खूप संतापले होते. ते म्हणाले, खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना आणि महापुराच्या काळात केलेले काम, त्यानंतर खेचून आणलेला निधी, लोकसभेत या विभागाच्या नागरिकांचा त्यांनी उठवलेला आवाज हे कदाचित तुपकरांना बघवलेले दिसत नाही. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत खासदार धैर्यशील माने यांच्यावर खालच्यास्तरावर जाऊन टिका केली, ते योग्य नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांचा त्यांनी घोर अपमान केला आहे. याच मतदारांनी यापूर्वी एकवेळ आमदार, दोनवेळा खासदार, एकवेळ जि.प. सदस्य केले होते. त्यांच्यावर आरोप करताना तुपकरांना जरातरी लाज वाटायला पाहिजे होती, असा प्रश्न करत प्रा. मोरे म्हणाले, एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावर शेतकरी आक्रमक होतील आणि ऊस परिषद यशस्वी होईल, असे संघटनेच्या नेत्यांना वाटत होते. पण, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा कोणताही विचार नाही, असे लेखी पत्रानेच कळविले आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत मुद्दाच उरला नव्हता. प्रत्येकवर्षी काहीतरी नवीन मुद्दा पुढे करुन शेतकर्यांची दिशाभूल करायची, ऊस परिषदेच्या निमित्ताने शेतकर्यांना एकत्रित करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे सुज्ञ ऊस उत्पादक आणि शेतकर्यांना समजल्याने ऊस परिषदेकडे ऊस उत्पादकांनी पाठ फिरविली आणि याचा परिणाम तुपकर आणि तथाकथीत शेतकरी नेत्यांचा जळफळाट झाला, त्यांची हवा गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला जनता पैसेही देते आणि मतही देते असा बडेजाव करायचा, माध्यमातून दिशाभूल करायची, चर्चा घडवून आणायची हा फंडा आता फसत चालला आहे, असे सांगत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीच्या उमेदवाराला केवळ 1 हजार मते पडली. त्यामुळे यांचा बुरखाच फाटला आहे. जाईल तिथे अपयश त्यामुळे यांची वैचारिक दिवाळखोरी आता निघाली आहे. पण, तुपकरांनी लक्षात ठेवावे, एक बोलाल तर शब्दांचे दहा बाण सुटतील. संयम ठेवावा आणि आपले काम तेवढे सांगावे. तुपकर कुठे निवडून आले होते, तुपकरांना कुणी निवडून दिले होते मला अजून आठवत नाही आणि तुपकरांच्या आडून कोणी बोलण्याचा प्रयत्नही करु नये. 11 लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने, श्रीमती निवेदिता माने, स्व. बाळासाहेब माने यांना दिलेले जनतेने प्रेम हा इतिहास तुपकरांनी वाचावा. यश आले तरीही माने घराण्याने स्विकारले आणि अपयश आले तरीही ते हसत पचवले. जनतेला दोषी धरले नाही, तुम्ही जनतेला दोषी धरत चालला आहात, आज चुकलात, अशा चुका करु नका.

ऊसाला प्रतिटन 3300 रु. मिळालेच पाहिजेत; अन्यथा संघर्ष अटळ

जयसिंगपूर,दि. 2021-10-20- घरगुती वीज ग्राहक, महापुरातील शेतकरी आणि सामान्य नागरिक, ऊस उत्पादक शेतकर्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने फसवले आहे, हे सरकार खोटारडे आणि लबाड आहे. शरद पवार यांनी फसवणूक सुरु केली आहे. आता मी, माझी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीशी संबंध तोडण्यापर्यंत पोहोचलो आहोत. आता त्यांच्या दारात जाणार नाही, त्यांना वर्तमानपत्रातून कळेल, आम्ही संबंध तोडलेत. लवकरच मिटींग घेऊन निर्णय घेऊ. या हंगामात साखर कारखानदारांना प्रथम एकरकमी एफआरपी द्यावी लागेल आणि नंतर उर्वरीत रक्कम म्हणजे एकूण 3300 रु. द्यावे लागतील अन्यथा जानेवारीत सुट्टीत देणार नाही, राज्यातील सर्वच कारखाने बंद पाडू, असा खणखणीत इशारा 20 व्या ऊस परिषदेत स्वाभिामनी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. गेली 20 वर्षे विक्रमसिंह मैदानात मी तुमच्यासमोर ऊस परिषदेतून दर मागतोय आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने आणि ताकदीने तो मिळवून घेतोय. 20 वर्षापूर्वी पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोकीला बँडेज होते, दाढी काळी होती, आज डोकीला बँडेज नाही आणि दाढी काळी झाली आहे. सावकर मादनाईकांच्या डोकीवर केसांचा कोंबडा होता, आज त्यांच्या डोकीचे विमानतळ झाले आहे. आम्ही दोघेही गेली 20 वर्षे याच प्रश्नावर भांडतोय, प्रश्न तसाच आहे, काळ मात्र बदलत गेला. त्यावेळी तरुण होतो, आज जेष्ठ झालो. महापुरात जे प्रचंड नुकसान झाले, शतकातील सर्वात मोठा महापूर होता, शेतकर्यांचे नुकसान झाले मला वाटले होते महाविकास आघाडीचे सरकार आपण आणलेले आहे, पावसात भिजत भिजत आपण आणले आहे. महापुरात आपले एवढे वाटेळे झाले म्हटल्यानंतर सर्वात अधिक महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांना जाण असेल असे वाटले होते. महाराष्ट्रातील शेतकर्यांनी मोठ्या आशेने हे सरकार बदलले होते. हा आक्रोश घेऊन, हे प्रश्न घेऊन पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत 5 दिवसांची परिक्रमा काढली आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बैठकीला बोलावले आणि सांगितले माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. 2019 च्या धर्तीवर शासन निर्णय होईल, मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन ती देऊ. तसे त्यांनी ट्विटही केले, त्यावेळी जिल्ह्यातील अनेक मंत्र्यांनी, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी सल्ला दिला होता, सरकार भरीव मदत करणार आहे मग आंदोलन कशाला करताय? आणि गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सरकारने महापुरातील शेतकर्याला, जनतेला आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना काय मदत केली हे वाचला असाल. ऑगस्ट महिन्यापासून मी सांगत होतो, गुंठ्याला 135 रु. हे देणार आहेत, त्यात मामुली 15 रु.ची वाढ करुन 150 रु. नुकसानभरपाई केली. तिकडे मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये परतीच्या मान्सूनने प्रचंड हानी झाली, कापूस पाण्यात बुडाला, भुईमूग, सोयाबीन पाण्यात बुडाला, उडीद-मूग बुडून गेला, जिरायत शेतकर्यांच्या दृष्टीने वर्षाची जगण्याची जिद्द होती ती सगळी पाण्यात वाहून गेली आणि त्यांच्याही वाट्याला निराशाच आली. जर सरकारकडे खरोखरच पैसे नव्हते तर त्याच काळात सरकारने सरकारी नोकरांना 11% महागाईभत्ता का दिला? या प्रश्नाचे उत्तर मला प्रथम पाहिजे. ज्या शेतकर्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या शेतकर्यांच्या विश्वासाचा केसाने गळा कापला, हे राज्य आम्ही शेतकर्यांसाठी बदलतोय असे शरद पवारांनी सांगितले होते, सातार्याच्या सभेत भिजत भिजत बोलला होता ना? असा प्रतिप्रश्न करत ते म्हणाले, तुम्हाला आता आठवण करुन द्यायची म्हणून बोलतोय. सरकारला आम्ही इशारा दिला, दसर्याला जर आमचा शिमगा झाला तर दिवाळीला तुमचा शिमगा केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला होता. आता माझा जपलेल्या उपस्थित शेतकर्यांना सल्ला आहे, महाविकास आघाडीचे मंत्री गावागावात दिवाळीला शुभेच्छा देण्यासाठी येतील तेव्हां हातात काळे झेंडे घेऊन त्यांचे स्वागत करा, असा थेट सल्ला देत राजू शेट्टी म्हणाले, मी अगोदरच सांगितले होते, यांची दिवाळी गोड होऊ द्यायची नाही. मी 5 दिवस पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत पाय सुजून घेऊपर्यंत मी पदयात्रा काढली, माझ्या दोन सहकार्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मग या महाविकास आघाडी सरकारला पाझर फुटेल असे मला वाटले होते पण, तसे घडले नाही. 2019 पेक्षा 800 रु.चा फरक पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईत आहे, हा आम्ही कोणाला विचारायचा? जगात साखरेचे भाव आज अधिक आहेत आणि अशा परिस्थितीत ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचा घाट राज्य आणि केंद्र सरकार करत असेल आणि ही सगळी सामील होऊन कट रचत असतील त्याबद्दल जाब विचारावा लागेल. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेले पत्र म्हणजे एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीला लिहिलेले पत्र एवढाच त्याचा अर्थ आहे. वास्तविकरित्या केंद्र सरकारने एफआरपीचे तीन तुकडे पडणार नसतील तर प्रेस नोट काढायला हवी होती. साखर कारखानदारांच्या फायद्यासाठीच प्रोफेसर रमेश चंद्र यांनी 21 जानेवारी, 30 ऑगस्ट आणि 20 नोव्हेंबर 2019 ला तीन बैठका घेतल्या आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांचा घाट घातला. राज्यातील आघाडी सरकार आणण्यासाठी स्वाभिमानीचा मोठा वाटा होता. पण, केंद्राला शेतकर्यांसंबंधीत अभिप्राय पाठवताना ऊसाचा दर ठरवताना विश्वासात घ्यावे, असे वाटले नाही. माझा शरद पवार यांना थेट प्रश्न आहे, तुम्ही शेतकर्यांच्या बाजूने राहणार असे आम्हाला सांगितले होते आणि आज कारखानदारांच्या बाजूने उभे रहात आहात. हे आघाडी सरकार येण्यास आमचा वाटा आहे, म्हणून आम्ही आज तुम्हाला विचारतोय. ज्यावेळी राष्ट्रवादीचे जहाज बुडायला लागले होते त्यावेळी शरद पवार यांनी लक्षात ठेवावे, तुमच्या बाजूला केवळ शेतकर्यांनी पाठिंबा दिला म्हणून तुमचे आमदार निवडून आले आणि आज तुम्ही कारखानदारांबरोबर राहता, शेतकर्यांबरोबर नाही? हेच कारखानदार राज्यात आणि केंद्रात भाजप असताना सीबीआय, ईडी, आयकर यांच्या भीतीने भाजपमध्ये गेले होते आणि आज तुम्हाला शेतकर्यांचा विसर पडला. एकरकमी एफआरपी दिली तर कारखाने बंद पडतील, म्हणून तुम्ही सूतगिरण्यांचे उदाहरण देता. हा साक्षात्कार तुम्हाला 10 वर्षापूर्वी का झाला नाही? तुम्हीच केंद्रीय कृषी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना संसदेसमोर तुम्हीच एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा केला होता. तो कायदा केला, काही सहकारी साखर कारखाने बंद पडले, तुमच्या जवळच्या बगलबच्च्यांनी ते विकत घेतले, त्यांची कर्जे फिटली आणि आज हे तुम्हाला आठवतेय? अजित पवार यांनी कर्जतच्या अंबाई खासगी कारखान्यात 2800 रु. एकरकमी एफआरपी देणार असे म्हटले. मग आम्ही काकावर विश्वास ठेवायचा की पुतण्यावर? कोण खोटे बोलतेय? शेतकर्याला मार द्यायचा आणि ऊस उत्पादकांचा फायदा घ्यायचा हे धोरण ठेवून पवारांनी अशीच वाटचाल सुरु ठेवली तर राष्ट्रवादी धोक्यात येईल आणि शेतकरी पाठ फिरवेल. आज मला मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, महाविकास आघाडीत गेल्याचा मला मोठा पश्चाताप होत आहे. वीज बिलात फसवलात आणि आज 18% व्याजे वीज बिले पाठवलीत, वीजेची कनेक्शन कट केलीत. महापूर, एफआरपी, वीज बिले यात तुम्ही फसवले आहे, यामुळे मी आज या मन:स्थितीत आलो आहे आणि उपस्थितांच्या सगळ्यांच्या मताशी मी सहमत आहे, महाविकास आघाडीशी संबंध तोडण्यापर्यंत मी पोहोचलोय, तो तोडण्याचा विचार मी करतोय, आता मी तुमच्या दारात येणार नाही, तुम्हाला वर्तमानपत्रातूनच कळेल, आम्ही तुमच्याशी संबंध तोडल्याचे. आम्ही मिटींग घेऊन ते ठरवू, असा गंभीर इशारा देऊन ते म्हणाले, 3300 रु. प्रतिटन ऊसाला दर मिळालाच पाहिजे. प्रथम एकरकमी एफआरपी द्या आणि त्यानंतर जानेवारीपर्यंत सगळी रक्कम द्या अन्यथा त्यानंतर आंदोलन करुन राज्यातील सर्व कारखाने बंद पाडू, असे सांगत त्यांनी 12 मागण्या केल्या.

शेट्टीसाहेब शांत डोकीने विचार करा, आघाडी सरकारचा नाद सोडा

जयसिंगपूर,दि. 2021-10-20- राजू शेट्टीसाहेब तुम्ही एकदा काय करा, शांत डोकीने विचार करा आणि या राज्यातील आघाडी सरकारचा नाद सोडा, लई फसवलय या सरकारनं, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते आणि शिरोळ विधानसभा मतदार संघातील प्रमुख अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानातील 20 व्या ऊस परिषदेत दिला आहे. सावकार मदानाईक बोलताना म्हणाले, याच सरकारने कोरोनाच्या काळात सांगितले तुमची लाईट बिले माफ करतो आणि आता कट करत आहेत. ते मागील भाजपाचे सरकार यांच्यापेक्षा लई चांगले होते असे वाटत आहे. लोकं महापुरातून घरात जायच्या आत 10-10 हजार रुपये त्यांनी छावणीत दिले होते आणि या सरकारने अजून कुणाला 5 हजार दिले, कुणाला 10 हजार दिले आणि कुणाला काहीच दिले नाही आणि शेतकर्याला गुंठ्याला 150 रु. देत आहेत. यांच्यापेक्षा मागील सरकार चांगलेच होते. पण, त्यांच्यात जायचे की नाही हे नंतर ठरवा, शक्यतो जाऊच नका, असे म्हणत मादनाईक म्हणाले, एफआरपीचे तुकडे कराल तर राज्य आणि केंद्र सरकारचे तुकडे करु. आम्हाला आमदारकी, खासदार की नसली तरी फरक पडत नाही. पण, तुम्ही निवडणुकीला राहिला तर आम्ही निवडून येऊ न येऊ पण, तुम्हाला मात्र, पाडू, एवढी ताकद शेतकर्यांच्यात आहे. गप्प बसावे म्हणजे किती दिवस गप्प बसावे, ऊस उत्पादकांना फसवणार, महापूरग्रस्तांना फसवणार, लाईट बिलात फसवणार, हे बरे नव्हे, असे त्यांनी म्हटले.

धैर्यशील माने यांनी अभिनेत्यासारखी कपडे घालायचे सोडून काम करावे-तुपकर

जयसिंगपूर,दि. 2021-10-20- खासदार धैर्यशील माने यांनी अभिनेत्यासारखी चांगली चांगली कपडे घातली म्हणजे चांगले खासदार होतील असे नाही. माने तुम्हाला निवडून येऊन 3 वर्षे झाली पण, तुम्ही एकदाही एकाही गरीब जनतेसाठी राबताना दिसला नाहीत. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील जनतेने एक नोट, एक प्लेट भडंग, एक वाटी रस्सा आणि 5 वर्षे बोंबलत बसा अशी स्वत:ची अवस्था करुन घेतली आहे, अशी गंभीर टिका स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. यावेळी बोलताना त्यांची जिभ मतदारांच्यावरही घसरली. 20 व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. शेतकर्यांच्या व्यथा कळण्यासाठी राज्यातील राजकारण्यांनी आपल्या बायकांना गायी, म्हैशी घेऊन द्यावेत आणि रानात कामाला लावून द्यावे, मग समजेल शेतकर्यांचे जगणे काय असते ते, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे तोंडभरुन कौतुक करत मागच्या सरकारने 900 रु.ने मदत केली आणि आता तुम्ही 150 रु. देऊन शेतकर्यांची चेष्टा करताय अशी गंभीर टिका केली. राजू शेट्टी यांनी आमदारकीला लाथ मारुन सवतासुभा मांडावा असा सल्ला त्यांनी दिला. राजू शेट्टी यांना मी विनंती करतो, त्यांनी राज्यातील या महाविकास आघाडी सरकारचा नाद सोडावा, फारतर कायमस्वरुपी आपण ब्रह्मचारी राहू, असेही त्यांनी म्हटले.

गजानन गरडे यांच्या आत्महत्त्येस तिघे जबाबदार

शिरोळ,दि. 2021-10-19- गजानन आप्पासो गरडे (वय 35, रा. माळेवाडी, नरवाड, ता. मिरज) यांच्या आत्महत्त्येस महादेव रामू जाधव (सासरे), विद्या महादेव जाधव (सासू) (दोघे रा. मायाक्का चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव), डॉ. किरण बबन शिंदे (रा. गणेशवाडी) हे जबाबदार आहेत अशी फिर्याद शिरोळ पोलिस ठाण्यात संजय आप्पासो गरडे (रा. नरवाड, ता. मिरज) यांनी दिली आहे, असे शिरोळ पोलिसांनी सोमवारी सांगितले. पोलीस असे सांगतात, सासरे, सासू आणि डॉ. शिंदे यांनी आपसात संगनमत करुन महादेव व विद्या यांची मुलगी प्रगती हिने 30 जून 2021 ला औषध प्राशन करुन आत्महत्त्या केल्यानंतर तिच्या आत्महत्त्येस गजानन यांना जबाबदार धरुन त्यांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने त्याच्याविरुध्द मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. त्यानंतर गजानन व त्याच्या नातेवाईकांकडून वारंवार पैशांची मागणी करुन पैसे नाही दिले तर तुला बघून घेतो अशी धमकी देऊन मयत गजानन यास मानसिक त्रास देऊन त्यास आत्महत्त्या करणेस चिथावणी दिल्याने 18 ऑक्टोबर रोजी आगरभाग जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील बी.एस.एस. मायक्रो फायनान्स कंपनी येथे आत्महत्त्या केली, अशी फिर्याद संजय गरडे यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.[1] 2 3 > >>