राष्ट्रीय न्यूज

नगरपालिकेसाठी चंद्रकांतदादा पाटील यांची आवळणी सुुरु

शिरोळ,दि. 2021-12-09- महान कार्य वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी येत आहेत. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची राजकीय आवळणी त्यांनी आत्तापासूनच सुरु केली आहे. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 डिसेंबरला सकाळी 9 वाजता ते शहरात पोहोणार आहेत. रात्री उशिरापर्यंत वेगवेगळे प्रमुख नेते आणि गठ्ठा मते असणार्यांशी संवाद साधणार आहेत. जयसिंगपूर पालिकेची निवडणूक गेल्या पंचवार्षिकमध्ये ताराराणी आघाडीतून लढविली होती. मात्र, येथे विधानपरिषद निवडणुकीत कटू अनुभव आला. त्यामुळे 10 डिसेंबरला सकाळी 10 वाजता ते जयसिंगपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 1 पर्यंत शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व भाजपाच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीचा आडाखा ते तयार करणार आहेत. यानंतर ते दुपारी 2 वाजता कुरुंदवाड येथे 8 प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधणार आहेत. कार्यकर्ते आणि नेत्यांची मते आणि मने येथे जाणून घेणार आहेत. याशिवाय 11 डिसेंबरला कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 मतदार संघातील प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. या दौर्यात त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, जिल्ह्याचे संघटक आणि भाजपाचे नेते विठ्ठल पाटील व अन्य मान्यवर असणार आहेत, असे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, सर्वांशी संवाद साधल्यानंतर एक गुप्त अहवालही राजकीयदृष्ट्या यश मिळविण्यासाठी तयार करण्याचे काम सुरु झाल्याचे कळते. भाजपाने काठावर कोण आहे, दररोज कोण कोणाशी संवाद साधतो, जिल्हा बँकेच्या निमित्ताने कोण कोणाच्या अतिप्रेमात पडून सेंद्रीय साखरेचा चहा पितो, इकडची माहिती तिकडे करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करणार्यांना गाडीतून घेऊन कोण फिरते आणि त्यांच्याच इशार्यावर कोण नाचते? याची माहिती बहुतेक भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत पोहोचली असल्याचे समजते.[1]